जळगाव प्रतिनिधी | बसवाहकाच्या सिटवर बसलेल्या प्रवाशाला कोठे जायचे आहे? असे विचारल्याचा राग आल्याने दारुच्या नशेत असलेल्या एका तरुणाने वाहकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना आज सकाळी बसस्थानकात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात संबंधित तरूणाविरुध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील भोणे येथील रहिवाशी असलेले रामकृष्ण रामदास शिंदे हे जळगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत आहे. नेहमीप्रमाणे सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास ते ड्युटीवर आले. त्यानंतर त्यांनी आगारातून बस क्र (एम.एच. २० बी.एल. ४०९७) ही जळगाव-लातूर बस स्थानकात उभी केली. बस निघण्याची वेळ झाल्यानंतर प्रकाश आहिरे व वाहक रामकृष्ण शिंदे हे बसजवळ आले. यावेळी बसवाहकाच्या सिटवर एक युवक बसलेला होता. वाहक शिंदे यांनी त्याला कोठे जायचे आहे असे विचारले? त्यावर त्याने बसमध्ये यायचे नाही का? मी मित्राला सोडण्यासाठी आलो आहे, असे सांगून वाहक शिंदे यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. वाद वाढल्यावर त्याने शिंदे यांना शिवीगाळ केली. तसेच दारुच्या नशेत असलेल्या प्रमोद शिंदे याने वाहकाला मारहाण केली. त्यानंतर वाहक शिंदे यांच्यासह इतरांनी चालक, वाहकांनी दारुच्या नशेत असलेल्या प्रमोद शिंदेला पकडून जिल्हापेठ पोलीसांच्या स्वाधीन केले. या प्रकारामुळे काही वेळ बस स्थानकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच जळगाव- लातूर बस देखील अर्धातास उशिराने मार्गस्थ झाली.