मध्यान्ह भोजनानंतर ९ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली ; पल्लवी सावकारेंची शाळेला भेट (व्हिडीओ)

bcac7f52 617a 4256 9312 5f2a0512cb30

 

भुसावळ प्रतिनिधी | तालुक्यातील कन्हाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिरमध्ये ९ विद्यार्थ्यांना उलट्या झाल्याने खळबळ उडाली आहे. पालकांमध्ये याप्रकाराबाबत संताप व्यक्त केला जातोय. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे यांनी शाळेला भेट देऊन पोषण आहाराची तपासणी करून नाराजी व्यक्त केली. निकृष्ट पोषण आहाराबाबत आपण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना त्यांनी सांगितले.

 

 

कन्हाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिरात पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भात व वरण दिल्या जाते. सोमवार दिनांक २२ रोजी विद्यार्थ्यांनी शाळेतील वरण भात खाल्ल्याने नऊ विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका कुंदा पाटील यांनी याबाबत पालकांना सूचना न देता विद्यार्थ्यांना किन्ही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरता नेले. त्यामुळे पालकांना अंधारात ठेवून शाळेने झालेला प्रकार लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तसेच भातामध्ये अळ्या असल्याचा आरोप करत त्यातून विद्यार्थ्यांना बाधा होऊन हा प्रकार घडला असून या घटनेनंतर झालेला प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून हा भात नष्ट करण्यात आल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली असता अतिशय निकृष्ट दर्जाचा पोषण आहार असून तांदळामध्ये अळ्या आढळल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

पोषण आहार हा अतिशय निकृष्ट दर्जाचा मिळाला असून हा आहार स्वीकारण्यात माझा नकार होता. मात्र, तरीही ठेकेदाराने जबरदस्ती हा निकृष्ट दर्जाचा दिल्याचा आरोप मुख्याध्यापिका कुंदा पाटील यांनी केला आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा पोषण आहार शिजवला जातो त्या ठिकाणी अस्वच्छता असून शाळा परिसरातही कायम अस्वच्छता असते यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कारवाई करावी तसेच पूरक पोषण आहारा संदर्भात शाळेला पुरवठा करणारा ठेकेदारावर कारवाई करून पोषण आहाराची नियमित तपासणी करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

 

 

Protected Content