Home क्रीडा  डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयातर्फे क्रीडा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन 

 डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयातर्फे क्रीडा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रथमच एसएनडीटी विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून, या स्पर्धांची रंगत  ८ ऑक्टोबरपासून जळगावमध्ये पाहायला मिळणार आहे. डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयाच्या पुढाकाराने ८ ते १० ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धा पार पडणार असून देशभरातील ३० महाविद्यालयांचे ४५० हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत.

या भव्य स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, टग ऑफ वॉर, तायक्वांदो आणि ॲथलेटिक्स या चार प्रमुख क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. व्हॉलीबॉल, टग ऑफ वॉर व तायक्वांदोच्या स्पर्धा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तर ॲथलेटिक्सची स्पर्धा एकलव्य क्रीडा संकुलात होणार आहे. या स्पर्धांचे उद्घाटन उद्या सकाळी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार असून, कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन समारंभासाठी एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार ॲड. उज्वल निकम, व्हाईस चान्सलर डॉ. रूबी ओझा, क्रीडा संचालिका डॉ. कविता खोलगडे, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, अतुल जैन, प्रा. नारायण खडके, क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात सहभागी स्पर्धकांच्या निवासाची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धकांसाठी वाहतुकीचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वा. डीजे नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. तर १० ऑक्टोबर रोजी पारितोषिक वितरण सोहळा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

या स्पर्धांच्या आयोजनातून केवळ क्रीडाक्षेत्रालाच चालना मिळणार नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासालाही हातभार लागणार आहे. महिला शिक्षण संस्था म्हणून परिचित असलेल्या डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयाकडून घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.


Protected Content

Play sound