Home Uncategorized डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॅम्पसमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह !

डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॅम्पसमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे गणरायाचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी बाप्पांचे स्वागत केले. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयातही ढोल-ताशा, लेझीम आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. संपूर्ण परिसर रंगीबेरंगी सजावट आणि दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता. प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांच्या हस्ते ही प्रतिष्ठापना करण्यात आली.

आयुर्वेद आणि नर्सिंग महाविद्यालयांचा सहभाग
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय आणि रिसर्च सेंटर येथेही सवाद्य गणपती बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली. अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांनी सपत्नीक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. या सोहळ्याला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातही गणेश स्थापना सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली.

पर्यावरणपूरक सजावट ठरली आकर्षणाचे केंद्र
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी इको-फ्रेंडली संकल्पना जपून टाकाऊ साहित्यापासून आकर्षक किल्ल्याची सजावट केली. पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारी ही सजावट विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली. सुमित आणि सोनाली निर्मळ यांच्या हस्ते गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोदावरी फाऊंडेशनच्या या सर्व संस्थांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, भक्तिमय, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा संगम पहायला मिळत आहे.


Protected Content

Play sound