Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाचा आरोग्य उपक्रम; रावेर तालुक्यात नेत्र तपासणी शिबिराची सुरुवात

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाचा आरोग्य उपक्रम; रावेर तालुक्यात नेत्र तपासणी शिबिराची सुरुवात


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातर्फे रावेर तालुक्यात व्यापक नेत्र तपासणी शिबिराला बुधवारपासून प्रारंभ झाला. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला असून ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या आजारांवर मोफत तपासणी व उपचार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे आयोजित या नेत्र तपासणी शिबिराची सुरुवात रावेर तालुक्यातील लहान वाघोदे येथून करण्यात आली. हे शिबिर ११ मार्चपासून सुरू होऊन १८ मेपर्यंत चालणार आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, हभप जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. नितू पाटील आणि त्यांच्या टीममधील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. शिबिराच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने या उपक्रमाबद्दल नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे दिसून आले.

या कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच दिपाली चौधरी, मनिषा सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य पूजा कोलते, फातेमा तडवी, प्रतिभा चौधरी, मनिषा कोळी, दमयंती शिंदे, जितेंद्र चौधरी, सत्तार पटेल, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पाटील, रवींद्र कोळी तसेच वैभव चौधरी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिरामध्ये नागरिकांची डोळ्यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार पुढील उपचारांची माहिती दिली जात आहे.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातर्फे जळगाव जिल्हा ‘मोतिबिंदू मुक्त’ करण्याचा संकल्प करण्यात आला असून या मोहिमेची सुरुवात रावेर तालुक्यापासून करण्यात आली आहे. डॉ. नितू पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेत्ररोग तज्ज्ञांची टीम संपूर्ण रावेर तालुक्यात गावोगावी जाऊन नागरिकांची नेत्र तपासणी करणार आहे. तपासणीदरम्यान ज्या रुग्णांना मोतिबिंदूची समस्या आढळून येईल, त्यांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी दिली.

या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या आजारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच मोफत तपासणी आणि उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. रावेर तालुक्यानंतर जिल्ह्यातील इतर तालुके व गावांमध्येही नेत्रतज्ज्ञांची टीम जाऊन नागरिकांची तपासणी करणार असल्याने या मोहिमेमुळे अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांपर्यंत दर्जेदार नेत्रसेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असून जिल्हा मोतिबिंदू मुक्त करण्याच्या संकल्पाला गती मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

 


Protected Content

Play sound