जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या वतीने जागतिक अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली. या अंतर्गत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील फिजिओथेरपी ओपीडीमध्ये मोफत अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस तपासणी व शारीरिक स्थिती मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश अॅक्सिअल स्पॉन्डिलोआर्थ्रायटिस या मणक्यांवर परिणाम करणाऱ्या आणि उपचार न झाल्यास दीर्घकाळ अपंगत्व निर्माण करणाऱ्या दीर्घकालीन जळजळीच्या आजाराबद्दल समाजात जागरूकता वाढवणे हा होता. या आजाराचे लवकर निदान आणि योग्य उपचार रुग्णांचे आयुष्यमान सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
या शिबिराचे आयोजन मस्क्युलोस्केलेटल विभागाच्या डॉ. रिया अग्रवाल आणि डॉ. विहा कोठारी यांनी केले होते. मस्क्युलोस्केलेटल शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थी आणि इंटर्न्सनी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. संपूर्ण टीमने रुग्णांना अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस या आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली. या शिबिरात एकूण ५२ रुग्णांची यशस्वी तपासणी करण्यात आली आणि त्यांना मोफत स्क्रिनिंग व शारीरिक स्थितीचे मूल्यांकन करून मार्गदर्शन करण्यात आले. या जनजागृतीपर उपक्रमाद्वारे सतत पाठदुखी आणि कडकपणासारख्या लक्षणांसाठी त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले.