जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी, शेतकरी आणि कृषी उद्योजकांसाठी आनंदाची बातमी असून, जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध कृषी शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक संलग्न अभ्यासक्रमांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.
महाविद्यालयामार्फत कृषी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम, उद्यानविद्या पदविका, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी पत्रकारिता, फळ उत्पादन, भाजीपाला उत्पादन तसेच फ्लोरीकल्चर आणि लँडस्केप गार्डनिंग यांसारखे आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कृषी क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि कृषी व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनाही उपयुक्त ठरणार आहेत. महाविद्यालयाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे विद्यार्थ्यांना आठवड्यातील शनिवार आणि रविवारी प्रत्यक्ष प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, आधुनिक शैक्षणिक सुविधा, डिजिटल शिक्षण व्यवस्था आणि प्रत्यक्ष शेतीतील कौशल्य विकासावर विशेष भर दिला जात असल्याने विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानासोबतच व्यावहारिक अनुभवही मिळतो.

महाविद्यालयाच्या माहितीनुसार, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता प्राप्त होण्यास मदत होते. याशिवाय विविध शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या संधी, कृषी उद्योग, फलोत्पादन, भाजीपाला उत्पादन, कृषी व्यवसाय आणि स्वयंरोजगाराच्या विविध क्षेत्रांमध्ये करिअर घडविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकते. प्रवेशासाठी जातीचा दाखला (लागू असल्यास), नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास), दहावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), आधार कार्ड, पॅन कार्ड, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, छायाचित्र आणि स्वाक्षरी यांसह आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी इच्छुकांनी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी डॉ. शैलेश तायडे यांच्याशी ९१ ९७१४९ ४७१३१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.



