राजपथावर घुमणार मराठमोळ्या डॉ. तनुजा नाफडे यांचा शंखनाद !

नागपूर प्रतिनिधी । स्वतंत्र भारताच्या इतिहासात ब्रिटीश मार्शल ट्युनऐवजी गायिका-संगीतकार डॉ. तनुजा नाफडे यांनी तयार केलेली शंखनाद ही मार्शल धुन प्रजासत्ताक दिनी राजपथावर घुमणार आहे.

देश स्वतंत्र होऊन सात दशके उलटली तरी आजवर लष्कराच्या सर्व संचलनांमध्ये ब्रिटीश ट्युनचाच गजर होत होता. यामुळे लष्कराने भारतीयत्वावर आधारित धुन तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले. भारतीय लष्काराच्या महार रेजिमेंटच्या प्लॅटिनम ज्युबलीप्रसंगी मेजर जनरल ओक यांनी २०१६ मध्ये या रेजिमेंटसाठी गीत तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी त्यांनी गीत रचण्याची जबाबदारी ब्रिगेडियर विवेक सोहेल यांना सोपवली होती. गीत तयार झाल्यावर मेजर जनरल ओक यांनी हे गीत संगीतबद्ध करण्याची जबाबदारी नागपूर येथील रहिवासी तथा विख्यात संगीतकार/गायिका डॉ. तनुजा नाफडे यांना दिली. तयार झालेली धून महार रेजिमेंटच्या प्लॅटिनम ज्युबली समारंभात वाजवण्यात आली. याप्रसंगी उपस्थित लष्काराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनाही ही धून आवडली व तेथेच त्यांनी डॉ. नाफडे यांना ही धून भारतीय लष्कराच्या मार्शल धूनमध्ये परावर्तीत करण्याची सूचना केली. त्यानुसार लष्कराने हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला पाठविला व तो लगेच मंजूर करण्यात आला. यामुळे नागपूरच्या धरमपेठ महाविद्यालयात संगीताच्या प्राध्यापिका असलेल्या डॉ. तनुजा नाफडे यांनी संगीतबद्ध केलेली शंखनाद ही धून आता राजपथावरील ७० व्या प्रजासत्ताक दिनी वाजणार आहे.

डॉ. नाफडे यांनी शंखनाद ही धून भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित तयार केली आहे. ही धून ६ मिनिटांची आहे. यात भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य सिंफनीचा मिलाफ करण्यात आला आहे. यामध्ये महार रेजीमेंटचे गौरवगान करण्यात आले आहे.

पहा :- शंखदान धुनचा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content