जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्याच्या वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील मातब्बर व्यक्तीमत्व असलेले डॉ. प्रताप जाधव यांचे रात्री उशीरा उपचार सुरू असतांना निधन झाले.
डॉ. प्रताप जाधव हे दुर्धर आजाराने ग्रासले होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार घेत असतांना रात्री अकराच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. नूतन मराठाच्या मागील बाजूस असलेल्या संकुलात त्यांनी प्रारंभी सेवा दिली. यानंतर भास्कर मार्केटमध्ये मालती ऍक्टीडेंट हॉस्पीटलच्या माध्यमातून त्यांनी रूग्णांची सेवा केली. अतिशय प्रसन्न स्वभावाचे डॉक्टर जाधव हे जिल्ह्यातील नामवंत अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून ख्यात होते.
यासोबत डॉ. प्रताप जाधव यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान देखील तितकेच महत्वाचे होते. केशवस्मृती प्रतिष्ठानच्या अनेक प्रकल्पांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. जळगाव जनता सहकारी बँकेसह अन्य माध्यमातून त्यांनी आपल्या गुणवत्तेची मोहर उमटवली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे गोरगरिबांचा डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती.
डॉ. प्रताप जाधव यांच्या निधनामुळे वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. लाईव्ह ट्रेंडस न्यूज परिवारातर्फे डॉ. प्रताप जाधव यांना आदरांजली !