‘डॉ.कुमुद बन्सल’ यांच्या स्मरणार्थ सुवर्णपदक प्रदान करण्यासाठी विद्यापीठाला दोन लाखाचा धनादेश

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.ए.(स्त्री अभ्यास) या पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस ‘डॉ.कुमुद बन्सल’ यांच्या स्मरणार्थ सुवर्णपदक प्रदान करण्यासाठी वाल्मिक केदार यांनी दोन लाख रूपयांचा धनादेश कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्याकडे सुपूर्द केला.

वाल्मिक केदार हे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून कुऱ्हा काकोडा, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव येथील रहिवाशी आहेत. कै.डॉ.कुमुद बन्सल ह्या दहा वर्षे शिक्षण सचिव या पदावर कार्यरत होत्या. शिक्षणव्यवस्थेला गुणात्मक विकासाची पायाभरणी करून सुयोग्य दिशा देणारे व्यक्तीमत्व म्हणून  कुमुद बन्सल परिचित आहेत. त्यांच्या नावे एम.ए. (स्त्री अभ्यास) या विषयात विद्यापीठातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस वाल्मिक केदार यांनी सुवर्णपदक जाहीर केले आहे. त्यांनी दोन लाख रूपयांचा धनादेश दि.२३ मार्च २०२२ रोजी कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा.के.एफ.पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल, प्रा.संतोष खिराडे, कक्षाधिकारी रवींद्र पाटील हे उपस्थित होते.

 

Protected Content