जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. वर्षा पाटील यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च मानली जाणारी एमसीएच न्युरोसर्जरीची पदवी यशस्वीरित्या प्राप्त केली आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण यशामुळे वैद्यकीय जगात एका नव्या, कुशल न्युरोसर्जनची भर पडली आहे.
डॉ. अनिकेत पाटील यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी पुण्यातील काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि जनरल सर्जरीमध्ये एम एस ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथे त्यांनी न्युरोसर्जरीमध्ये एमसीएचची अत्युच्च पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली. हे यश त्यांनी कठोर परिश्रम, दृढ संकल्प आणि वैद्यकीय क्षेत्राप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर मिळवले आहे.
डॉ. अनिकेत पाटील यांनी आपल्या आई-वडिलांचा वैद्यकीय वारसा पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. ते लवकरच एक न्युरोसर्जन म्हणून रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे मेंदू आणि मणक्याच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना आशेचा किरण मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, उत्कृष्ट कौशल्ये आणि रुग्णांप्रति संवेदनशील दृष्टिकोन या त्रिसूत्रीच्या आधारे डॉ. अनिकेत पाटील रुग्णसेवेला एक नवीन दिशा देतील, यात शंका नाही.
डॉ. अनिकेत यांच्या या शानदार यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनच्या वतीने श्रीमती गोदावरी पाटील, डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, सुभाष पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अक्षता पाटील यांच्यासह संपूर्ण गोदावरी परिवाराने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.