चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील घाट रोड बाजार समिती जवळील पंक्चरच्या दुकानातील हवेच्या टाकीत जास्त हवा भरली गेल्याने तिचा स्फोट झाला. या स्फोटात टाकीचे तुकडे वर असलेल्या इलेक्ट्रॉनिक तारांना लागल्यामुळे जवळच असलेल्या डीपीवर याचा शॉर्टसर्किट होऊन डीपीला आग लागली.
या ठिकाणी नेहमी मोठी वर्दळ असते. सुदैवाने यावेळी जास्त गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. या ठिकाणी तात्काळ शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, पांडुरंग बोराडे, अनिल कुडे, प्रभाकर ओगले, बाप्पू वाणी, दिनेश विसपुते, भीमा निकुंभ, सुरेश चव्हाण आदी धावून गेल्याने पुढील मोठा अनर्थ टाळला. तत्काळ मदत कार्य होऊन अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. दरम्यान, या रस्त्यावर झालेले मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हे नेहमीच या ठिकाणी वाहतुकीची कोंडी करणारे व रस्त्यावर असलेल्या वेल्डिंग वर्कशॉप पंचर दुकाने हे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण करणारे झाले असल्याने नगरपालिकेने हे अतिक्रमण काढून टाकावे अशी मागणी होत आहे.