भोपाळ (वृत्तसंस्था) दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दलच्या विधानामुळे भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह वादात सापडल्या होत्या. यानंतर आता लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा वादंग निर्माण झाले आहे. करकरे यांनी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून केलेल्या कामाबद्दल महाजनांनी शंका उपस्थित केलीय.
सुमित्रा महाजन यांनी एका इंग्रजी दैनिकाला प्रतिक्रिया देताना हेमंत करकरे यांच्याविषयी भाष्य केले. सुमित्रा महाजन म्हणतात, माझ्याकडे ठोस पुरावे नाहीत. पण काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि हेमंत करकरे हे मित्र होते असे मी ऐकून आहे. दिग्विजय सिंह हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना वारंवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप करायचे. संघ बॉम्ब तयार करत असल्याचा आरोप ते करायचे, याकडेही महाजन यांनी लक्ष वेधले. सुमित्रा महाजन यांनी दिलीप पाटीदार या तरुणाचा मुद्दाही उपस्थित केला. दिलीप पाटीदार याला महाराष्ट्र एटीएसने २००८ साली इंदूरमधून अटक केली होती. मात्र, त्यानंतर दिलीप पाटीदार हा बेपत्ता झाला असून या प्रकरणी न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती, असे महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, मृत्यू झाला म्हणून त्यांना शहीद मानले जाईल, मात्र एटीएसप्रमुख म्हणून त्याची भूमिका योग्य नव्हती’, असे विधान करत महाजन यांनी शहीद करकरे यांनी एटीएस प्रमुख म्हणून घेतलेल्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. महाजन यांनी त्यांच्या विधानातून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधल्याचे बोलले जात होते. महाजन यांच्या विधानाला सिंह यांनी प्रत्युत्तर दिलेय. ‘सुप्रिया ताई, तुम्ही अशोक चक्र विजेत्या हेमंत करकरेंसोबत माझं नाव जोडत आहात, याचा मला अभिमान वाटतो,’ अशी प्रतिक्रिया दिग्विजय सिंह यांनी दिली आहे. तसेच मी मुख्यमंत्री असताना सिमी आणि बजरंगदल या दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याची शिफारस करण्याचे धैर्य दाखवले होते. माझ्यासाठी देश हा अग्रगण्य आहे, तुच्छ राजकारण नाही, अशा शब्दांत सिंग यांनी महाजन यांना टोला लगावला आहे.