मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांनी केलेल्या एका विधानाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला असला तरी जयंत पाटील यांनी ही बैठक सुरू असल्याची माहिती दिल्याने सर्व जण चक्रावून गेले आहेत.
आज सायंकाळी साडेसात वाजता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक होणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. ही बैठक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार होती. दरम्यान, काँग्रेसचे नेते येण्याआधी राष्ट्रवादीचे नेते तेथे उपस्थित होते. यानंतर अचानक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह तेथून बाहेर पडले. तेथे उपस्थित असणार्या पत्रकारांनी याबाबत विचारणा केली असता अजितदादांनी बैठक रद्द झाली असून आपण बारामती येथे निघाल्याचे सांगितले. यामुळे या बैठकीवरून संशयकल्लोळ निर्माण झाला. थोड्या वेळानंतर शरद पवार यांनी अजित पवार हे मुंबईतच असल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण अजितदादांसह मुंबईतच असून दोन्ही पक्षांची बैठक होणार असल्याचे स्पष्ट केले.