सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या रोझोदा येथील एका वृध्द दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे घटना सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, रोझोदा येथे ओंकार पांडुरंग भारंबे ( वय९०) आणि त्यांची पत्नी सुमन ओंकार भारंबे (वय ८५) हे वयोवृध्द दाम्पत्य राहते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले होते. शासकीय नियमानुसार दररोज सकाळी डॉक्टर येऊन कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना चेक करत असतात. या अनुषंगाने आज सकाळी डॉक्टर चेकींगसाठी आले असता त्यांना भारंबे दाम्पत्याच्या घराचा दरवाजा थोडा उघडा दिसला. आवाज देऊनही घरातून कुणी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी दरवाजा उघडला. तेव्हा हे दोन्ही पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसून आले.
दरम्यान, संबंधीत डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार सावदा येथील पोलिसांनी तेथे तातडीने धाव घेतली. एपीआय राहूल वाघ हे आपल्या सहकार्यांसह तेथे पोहचले असून त्यांनी माहिती घेण्यास प्रारंभ केला आहे. तर डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी देखील रोझोदा येथे घटनास्थळी भेट दिली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोवर दोन्ही जणांचे मृतदेह घटनास्थळीच पडलेले होते. तर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.