बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत तेजम केशव, राजश्री पाटील यांना दुहेरी मुकुट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन प्रायोजित व स्वर्गीय विनोद जवाहरानी उर्फ (बंटी भैय्या) यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत ‘जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा २०२३’  २१ ते २३ जुलै २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १९९ खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.  स्पर्धेत तेजम केशव, राजश्री पाटील यांनी दुहेरी मुकुट प्राप्त केला.

 

स्पर्धेच्या पारितोषीक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्ह्याची पहिली बॅडमिंटन महिला राष्ट्रीय खेळाडू  कु. अनिता ध्यानी व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन चे संस्थापक डॉ. तुषार उपाध्ये,  शिल्पा फर्निचरचे राजकुमार मनोज व शितलदास जवाहरानी, राजेश जवाहरानी, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सहसचिव तनुज शर्मा, सदस्य शेखर जाखेटे व मुख्य पंच श्रीमती चेतना शाह उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अनुप नाथांनी, प्रेम हसवानी, घनश्याम अडवाणी, डॉ. तळेले, अतुल ठाकूर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. उपस्थितीत मान्यवरांच्याहस्ते विजयी व उपविजयी खेळाडूंना जळगाव जिल्हा चॅम्पियनची ट्रॉफी, प्रमाणपत्र व सिताफळचे रोप देण्यात आले.

 

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शाह व पंच म्हणून खुशाल भावसार, भूषण पाटील, गीता अखिलेश पंडित, शुभम जितेंद्र चांदसरकर, शुभम पाटील, देवेंद्र कोळी यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत जाजीब शेख, दिपिका ठाकूर, अक्षय हुंडीवाले,  अतुल ठाकूर, करण पाटील, देव वेद, पुनम ठाकूर, सुमिती ठाकूर, शुभम चांदसरकर, तेजम केशव, राखी ठाकूर,  हमजा खान, आर्य गोला, प्रणेश गांधी, करण पाटील, फाल्गुनी पवार, कोनीका पाटील यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन जैन स्पोर्टस अकॅडमीची खेळाडू गीता पंडित यांनी केले. आभार प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांनी मानले.

 

या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे पुढच्या होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा चषक स्पर्धेसाठी शुभेच्छा व अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व मनोज आडवाणी यांनी केले.

Protected Content