जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून भाजप व शिंदे गटाच्या पॅनलसोबत असणारे राष्ट्रवादीचे नेते संजय पवार यांनी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी स्वगृही परतण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अजित पवार यांनी स्पष्टपणे दरवाजे बंद असल्याचे बजावले आहे.
जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. दोन्ही बाजूंनी अनेकदा प्रयत्न करून देखील सूर न जुळल्याने निवडणूक अटळ झाली. आज दिवसभरात राष्ट्रवादीचे नेते संजय पवार यांनी दोन्ही गटांमध्ये समन्वयासाठी भूमिका निभावली. त्यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांसोबत चर्चा करून नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांशी देखील चर्चा केली. आज दुपारपर्यंत ते युतीच्या नेत्यांसोबत बसले होते. दुपारी मात्र ते महाविकास आघाडीकडे आले. या सर्व घडामोडींमध्ये निवडणूक बिनविरोध होण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरलेत. यामुळे आता एकीकडे ना. गिरीश महाजन व ना. गुलाबराव पाटील तर दुसरीकडे एकनाथराव खडसे असा तगडा मुकाबला होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, संजय पवार हे दुपारी महाविकास आघाडीकडे आले. त्यांनी आपल्याला बिनविरोध करण्याची विनंती केली. एकनाथराव खडसे यांनी याबाबत अजितदादा पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यांनी दुसरीकडे जायला नको पाहिजे होते असे सांगत याला नकार दिला. यामुळे आता संजय पवार यांना पक्षाचे दरवाजे बंद झाले असल्याची घोषणा आमदार एकनाथराव खडसे यांनी केली. अर्थात, संजय पवार यांना कोलांटउडी भोवल्याचे दिसून येत आहे.