मुंबई, लाइव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | आगामी जून महिन्यात राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. नेहमी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसला डावलतात, दुय्यम स्थान देतात अशी नाराजी कॉंग्रेसचे मंत्री, नेते व्यक्त करत असून राष्ट्रवादीकडून संभाजीराजे यांच्या उमेदवारीसाठी अनुकूलता दर्शविण्यात आली असली तरी, आम्हाला गृहीत धरू नका, अशी भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून आपसात कुरबुर नेहमी सुरूच आहेत. परंतु राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यातल्या सहाव्या जागेवरूनच सध्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्रातून विधानसभा सदस्यांमधून राज्यसभेवर उमेदवार निवडून येण्यासाठी किमान ४१ मते आवश्यक आहेत. विधानसभेत भाजपचे १०६ आमदार असून संख्याबळानुसार भाजपचे दोन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. शिवसेनेचे ५५, राष्ट्रवादीचे ५३ आणि काँग्रेसचे ४४ असे आमदार असून त्यांचा प्रत्येकी एक-एक उमेदवार निवडून येऊ शकतो. असे राज्यसभेचे पाच जागांचे गणित निश्चित आहे.
यावरून मतांची गोळाबेरीज पहिली तर भाजपचे २४, राष्ट्रवादीचे १२, शिवसेनेचे १३ कॉंग्रेसचे ३ मते शिल्लक राहतात या शिल्लक मतावर कोणत्याही एका पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही.
सहाव्या जागेसंदर्भात भाजपाने त्यांचे गुपित उघड केलेले नाही आणि राष्ट्रवादीकडून संभाजीराजे यांच्या उमेदवारीसाठी अनुकूलता असली, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात आपणास काही माहिती नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे निवडून येण्यासाठी पाहिजे तितकी मते नसतानाही शिवसेना सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार देणार असल्याचा आग्रह करीत आहे.
एकूणच सहावी जागा प्रतिष्ठेची करीत असल्याचा प्रयत्न शिवसेना करीत आहे. आणि या सहाव्या जागेवरूनच शिवसेना वा राष्ट्रवादी आम्हाला गृहित धरू नका, असे कोंडीत धरत कॉंग्रेसचे महत्त्व वाढविण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचित केले आहे.