Home प्रशासन नियमबाह्य आंदोलनात सहभागी होऊ नका; यावल कृउबाचे व्यापाऱ्यांना आवाहन

नियमबाह्य आंदोलनात सहभागी होऊ नका; यावल कृउबाचे व्यापाऱ्यांना आवाहन

0
113


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून व्यापारी बांधवांकडून कोणत्याही प्रकारची अतिरिक्त फी आकारली जात नाही. काही घटकांकडून जाणीवपूर्वक खोट्या अफवा पसरवून व्यापाऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. व्यापारी बांधवांनी अशा अफवांना बळी न पडता आपले नियमबाह्य आंदोलन तातडीने मागे घ्यावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी बाजार समितीचे कनिष्ठ लिपिक डिगंबर चौधरी हे कर्तव्यावर असताना काही व्यापाऱ्यांनी त्यांना मारहाण केली होती. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण करण्याच्या हेतूने काही व्यापाऱ्यांनी ‘खेडाखरेदी’ बंदचे आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन पूर्णतः नियमबाह्य असून केवळ दबावतंत्राचा भाग असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी म्हटले आहे.

बाजार समिती प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, फी आकारणीबाबतचे सर्व आरोप निराधार आहेत. केवळ मारहाणीच्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी काही लोक अफवा पसरवून व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. सध्या शेतीमालाच्या आवकेचा काळ असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कोणत्याही बेकायदेशीर आंदोलनात सहभागी होऊ नये.

शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी बाजार समिती सदैव तत्पर आहे. मात्र, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचे समर्थन केले जाणार नाही. तरी व्यापारी बांधवांनी वस्तुस्थिती समजून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सर्व संचालक आणि सचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


Protected Content

Play sound