
पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पीक विमा योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या पीक कापणी प्रयोगात (Crop Cutting Experiment) काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भात पीक कापणी प्रयोगात चुकीचे वजनकाटे वापरून शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा प्रकार उघड झाल्याने या प्रक्रियेची पारदर्शकता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या पार्श्वभूमीवर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील यांनी “पीक कापणी प्रयोगात मापात पाप होऊ नये” असे स्पष्ट सांगत, शेतकऱ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.

केंद्र व राज्य सरकार तसेच विमा कंपन्यांच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विमा रकमेचे गणित हे ‘पीक कापणी प्रयोग’ आणि ‘उंबरठा उत्पन्न’ या दोन घटकांवर आधारित असते. प्रत्येक महसूल मंडळात एका हंगामात बारा पीक कापणी प्रयोग केले जातात. हे प्रयोग रँडम पद्धतीने निवडलेल्या सहा गावांमध्ये घेतले जातात, आणि प्रत्येक गावात दोन ठिकाणी ही प्रक्रिया केली जाते. यावेळी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी आणि स्थानिक दोन प्रगत शेतकरी यांच्या उपस्थितीत प्रयोग केला जाणे अपेक्षित असते. या प्रयोगातून प्रति हेक्टर सरासरी उत्पादन ठरवले जाते, आणि त्याच आकड्यांवर आधारित राहून सरकार व विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ठरवतात.
मात्र, विदर्भात काही ठिकाणी या प्रयोगादरम्यान बेकायदेशीर वजनकाट्यांचा वापर केल्याचे समोर आले आहे. या फसवणुकीमुळे प्रत्यक्षात पिकांचे नुकसान झाले असतानाही शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळत नाही, असे प्रकार उघडकीस आल्याने राज्यभरातील शेतकरी संघटनांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर किशोर पाटील यांनी इशारा दिला की, “जर अशा बेकायदेशीर कृतीत पीक विमा प्रतिनिधी दोषी आढळले, तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.”
त्यांनी पुढे सांगितले की, “पीक कापणी प्रयोग आणि उंबरठा उत्पन्न हे शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सत्यतेचे पालन करणे आवश्यक आहे. शासनानेही या प्रक्रियेत डिजिटल मोजमाप पद्धतीचा वापर करून भ्रष्टाचाराला आळा घालावा.” त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी प्रयोगाच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून मोजमाप आणि वजन प्रक्रियेवर लक्ष ठेवावे, जेणेकरून कुणालाही अन्याय होऊ नये.



