कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशात नेव्हीचा वेगळा इतिहास आहे. नौदलावर ढकलणे म्हणजे नौदलाचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे नेव्हीला बदनाम करू नका, असा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेला सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे आमदार सतेज पाटील म्हणाले. दरम्यान, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवस्था बघितल्यानंतर आज वेदना होत आहेत, संताप होतोय. पुतळा तयार करताना योग्य खबरदारी घेतली नाही हे यावरून दिसत आहे. उद्घाटनाच्या घाईसाठी अनुभव नसणा-या लोकांना हे काम दिले गेले होते. इव्हेंट करण्यासाठी इतकी गडबड केली गेली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार असे करत आहे हे खरेच दुर्दैवी आहे.
देशात नौदलाला वेगळा इतिहास आहे. नेव्हीवर ढकलणे म्हणजे नेव्हीचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे नेव्हीला बदनाम करू नका, चूक झाली असेल तर शासनाने माफी मागितली पाहिजे. सोबतच या घटनेची जबाबदारी घेऊन राज्य सरकारने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. आपटे नावाच्या व्यक्तीला हे काम देण्यासंदर्भात नेव्हीला कोणी सांगितलं, कोणत्याही शास्त्रात न बसणारे नियोजन या पुतळ्याच्या बाबतीत केलं गेलं. चूक झाली असेल तर शासनाने माफी मागावी मात्र स्वत:चे पाप दुस-यावर ढकलण्याचे काम हे सरकार करतेय, असा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.