पंतप्रधान मोदींकडून स्वत:च्या बचतीतून दान

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । कोरोनाच्या संकटकाळात लढण्यासाठी केंद्र सरकारने पीएम केअर्स फंडाची निर्मिती केली आहे. या फंडात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वत:च्या मिळकतीतून २ लाख २५ हजारांचे दान केले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटींवर ही माहिती दिली .

पीएम केअर्स फंडावरून विरोधी पक्षांनी आतापर्यंत अनेकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आधीपासूनच पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी अस्तित्वात आहे आणि तो असतानाही पुन्हा दुसऱ्या फंडाची आवश्यकता काय, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे पीएम कअर्स फंडाचे भारताचे महालेखाकार ऑडिट करू शकत नाही. पीएम केअर्स फंडाला विदेशीं देणगी नियमन कायद्यातून सूट देण्यात आलेली आहे. यासाठी परदेशी फंड स्वीकारण्यासाठी एक वेगळे अकाउंट देखील उघडण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी या पूर्वी मुलींच्या शिक्षणाच्या योजना आणि स्वच्छ गंगा अभियानासारख्या योजनांसाठी दान केलेले आहे. मोदी यांनी आतापर्यंत अनेक योजनांमध्ये दिलेले दान आणि खासगी वस्तूंच्या लिलावातून आलेली रक्कम पाहता त्यांनी आतापर्यंत एकूण १०३ कोटी रुपये दान केले आहे.

सन २०१९ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी कुंभमेळ्यात सुरक्षा रक्षकांसाठी तयार करण्यात आलेल्या कॉर्पस फंडात खासगी बचतीतून २१ लाख रुपयांचे दान दिले होते. दक्षिण कोरियामध्ये मोदी यांना सोल पीस प्रोइझ देण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी तेव्हा मिळालेल्या २१ लाखांची रक्कम ते स्वच्छ गंगा अभियानासाठी दान करत असल्याची घोषणा केली होती. या व्यतिरिक्त, नुकतेच त्यांना मिळालेल्या स्मृतिचिन्हांचा लिलाव झाला होता. यात त्यांनी ३ कोटी ४० लाख रुपये गोळा केली होती. ही रक्कम देखील ‘नमामि गंगे’ अभियानाला दान देण्यात येत आहे.

Protected Content