दिपनगर, ता. भुसावळ-योगेश तळेले | एकीकडे मराठीला अभिजात भाषेच्या दर्जासह मराठीत्वाचा गौरव होत असतांना दुसरीकडे दिपनगरच्या औष्णीक विद्युत प्रकल्पात परप्रांतीय ठेकेदारांसाठी स्थानिक कंत्राटदारांचा बळी देण्याचे कारस्थान रचण्यात आले असून यात अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.
दीपनगर येथे नविन उभारल्या जाणाऱ्या ६६० मे.वॅ.औष्णिक विद्युत प्रकल्पाचे हस्तांतरण लवकरच काही दिवसांमध्ये म.रा.वि.नि.कं.लि च्या अधिपत्याखाली होणार असून वरिष्ठ अधिकारी वर्गाने व्यैयक्तिक आर्थिक लालसेपोटी कट कारस्थाने करून भविष्यात स्थानिक कंत्राटदारांना आणि कामगारांना डावलून व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल असे षडयंत्र रचलेले आहे. यात प्रकल्पात चालू असलेले सर्व लहान कामाचे कंत्राट एकत्रित करून एका मोठ्या कंत्राटांतर्गत नविन प्रकल्पातील सर्व कामे एकाच एजन्सीला देण्याचे षडयंत्र म.रा.वि.नि.कं.लि.ने रचलेले असून सदर कामांचे कंत्राटे परप्रांतीय कंपनीला रातोरात दिले गेल्याचा आरोप स्थानिक कंत्राटदार संघटनेकडून करण्यात आला आहे.
प्रकल्पाकरिता शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत करतेवेळी स्थानिक कंत्राटदार आणि कामगारांना म.रा.वि.नि.कं.लि. प्रशासनाकडून रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले गेले असल्याचे समजले.परंतू आजची स्थिती पाहता असे आढळून आले की प्रशासनाने स्थानिक कंत्राटदार आणि कामगारांनासोबत सरळसरळ धोखाधडी केल्याचे दिसते. यामुळे स्थानिक ठेकेदार उद्धस्त होणार आहेत.
लाईव्ह ट्रेंड्स न्युजच्या सखोल परीक्षणातून आणि निगडीत विषयाच्या अभ्यासाच्या माध्यमातून असे निदर्शनास आले आहे की भुसावळ औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात बऱ्याच काळापासून कार्यरत आणि भु.औ.वि.नि.कं.लि.च्या प्रशासनावर दबदबा असलेल्या एका नावाजलेल्या स्थानिक परप्रांतीय कंत्राटदाराची ही उच्चस्तरीय खेळी असून भविष्यात सदर कंत्राटदाराकडून भु.औ.वि.नि.कं.लि.वर स्वत:चे अधिपत्य गाजविण्या करिताचे हे उच्च पातळीवरचे गलिच्छ षडयंत्र असल्याचे निदर्शनास येते.
भुसावळ औष्णिक विद्यूत केंद्रात मध्ये मा.मुख्य अभियंता भदाणे यांचेकडून घेतलेले निर्णय आणि निर्गमित केलेले काही आदेश यांचा सारासार विचार केला असता हे सर्व या भयंकर कारस्थानाचा एक भाग असून भविष्यात भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रांची एक हाती सत्ता अशा चाणक्य नीतीचा वापर करून नात्याने “जीजा -साला” असलेल्या स्थानिक परप्रांतीय कंत्राटदाराजवळ येईल यात काडीमात्र शंका नाही.
सदर षडयंत्रामध्ये म.रा.वि.नि.कं.लि.मधील मुख्यालयात उच्च पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा असून स्थानिक परप्रांतीय कंत्राटदार आणि उच्च अधिकाऱ्यांमध्ये फार मोठी देवाणघेवाण झालेली असल्याची शक्यता नाकारताच येत नाही.लाईव्ह ट्रेंड्स न्युजच्या माध्यमातून लवकरच काही दिवसांत भ्रष्ट कारभाराचा भांडाफोड करून लवकर जनतेच्या समोर सत्य आणले जाईल.