भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एसबीआय बँक परिसरात असलेल्या पत्राच्या शेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एकावर भुसावळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी ८ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता करण्यात आली. याप्रकरणी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील एसबीआय बँक परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार चारचाकी वाहनांमध्ये भरून शासनाची फसवणूक होत असल्याचे माहिती भुसावळ तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सोमवारी ८ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता पथकाने शहरातील एसबीआय बँक परिसरातील पत्र्याच्या शेड येथे छापा टाकला. या ठिकाणी त्यांनी गॅस सिलेंडर, गॅस भरण्याचे सस्पेन्शन मशीन, इलेक्ट्रिक काटा असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक अतुल वाकोजी नागरजोगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख कादर खाटीक रा. आयान कॉलनी भुसावळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तेजस परिसरकर हे करीत आहे.