भुसावळ (विशेष प्रतिनिधी) येथील प्रवर्तन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व जनगणना विभागाचे निवृत्त उपसंचालक शामकांत शिरसाट यांच्या संकल्पनेतून आणि प्रवर्तन बशुउद्देशिय संस्थेच्या सदस्यांनी दोन वर्षे केलेल्या टोकरे कोळी समाजाच्या अभ्यासातून या समाजाच्या चालीरिती, इतिहास, संस्कृती यावर एक माहितीपट तयार केला आहे. सदर माहितीपटाचे प्रसारण भुसावळ येथील कोळी समाज मंगल कार्यालयात, रविवारी (दि.१९ मे) सकाळी १०.०० वाजता एलईडी स्क्रीनवर होणार आहे.
याबाबत शामकांत शिरसाट यांनी सांगितले की, जिल्हयात सुमारे साडेतीन ते चार लाख संख्येने टोकरे कोळी समाज राहत असून समाजाची बोलीभाषा, इतिहास, चालीरीती यावर आजवर दृकश्राव्य माध्यमातून चित्रफीत उपलब्ध नव्हती. त्यामुळे जातपडताळणी समितीकडून वैधता मिळवतांना चुकीचे संदर्भ लावले जायचे. याबाबत प्रवर्तन संस्थेने पुढाकार घेवून संस्थेचे सदस्य रवी कोळी व रामचंद्र साळुंखे यांनी जनजागृती केली. या संस्थेसोबत कोळी समाज मंगल कार्यालय भुसावळ, आदिवासी टोकरे कोळी समाज परिषद जळगाव, महर्षी वाल्मिक आदिवासी कोळी समाज मंडळ कल्याण. आदी संस्थांनी एकत्रीत काम करून प्रशांत सोनवणे यांच्या नर्मदा फिल्मसच्या सहकार्याने हा माहितीपट तयार केला आहे. सदर माहितीपटाला आगामी काळात शासन दरबारी मान्यता मिळण्याचे प्रयत्न प्रवर्तन संस्था करणार आहे.तरी सदर माहितीपट पाहण्यासाठी टोकरे कोळी समाज बांधवांनी रविवारी सकाळी १०.०० वाजता भुसावळ येथे आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन प्रवर्तन बहुउद्देशीय संस्थेने केले आहे.