तंदुरुस्त राहण्यासाठी बाहेरून प्रोटीन घेऊ नका- डॉ. राजपूत

dr.rajput

जळगाव, प्रतिनिधी | प्रत्येकाने तंदुरुस्त राहण्यासाठी सेंद्रीय फळे व भाजीपाला असा आहार घ्यावा, बाहेरून प्रोटीन घेऊ नये, असा मौलिक सल्ला येथील हृदयरोगतज्ञ डॉ.जे.बी. राजपूत यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित शारीरिक शिक्षण संचालकांच्या क्रीडा शिबिरात व्याख्यान देतांना दिला.

 

क्रीडा शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.30) डॉ.जे.बी.राजपूत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंचावर विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील हे होते. डॉ.राजपूत यांनी समुद्रात जलतरण करतांना भरती ओहोटीचा अभ्यास करुनच जलतरण करावे. खेळतांना मानेची इजा झाल्यास ती गंभीर असू शकते, याकरीता प्रथमोपचार करतांना योग्य ती खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. खेळ सुरु होण्यासाठी धावणे किंवा पुरक व्यायाम करावा नंतरच खेळास सुरुवात करावी.  तसेच खेळ संपल्यानंतर कुलींग व्यायाम करावा असेही मार्गदर्शन केले. क्रीडा शिबिराची सुरुवात मैदानावरील सत्राने सकाळी ६.०० वाजता झाली. त्यावेळी प्राणायाम, योग प्रात्यक्षिके, एरोबिक्स, रनिंग, इ. मध्ये शारिरीक शिक्षण संचालकांनी सहभाग घेतला.

व्याख्यान प्रथम सत्रात खडकेश्वर (औरंगाबाद) येथील शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शत्रूंजय कोटे यांनी प्रत्येकाने आपले शरीर तंदुरस्त ठेवले पाहिजे. शरीर एका यंत्राप्रमाणे काम करीत असल्याने त्याच्या प्रत्येक अवयवाची निगा राखणे आवश्यक आहे. त्याकरीता नियमित व्यायाम, प्राणायाम, योगा करणे आवश्यक आहे, अशी माहिती दिली.

दुपार सत्रात नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ.सिंकु कुमार यांचे व्याख्यान झाले. त्यांनी खेळांमधील हालचाल व शक्ती यावर शास्त्रेाक्त पध्दतीने मांडणी करुन सखोल व विस्तृत माहिती दिली. याशिवाय आंतरशाखीय विद्या शाखेच्या अधिष्ठाता प्राचार्य डॉ.लता मोरे, प्राचार्य डॉ.अशोक राणे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रा.एस.टी. भूकन व धुळे येथील प्राचार्य डॉ. सनेर यांनी शिबिरास भेट दिली.

Protected Content