जळगाव प्रतिनिधी | काल सर्वत्र दिपोत्सव उत्साहात साजरा झाला असतांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या सौभाग्यवतींसह निराधारांना मध्यरात्रीच्या सुमारास खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत करून अनोख्या पध्दतीत दिवाळी साजरी केली.
जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी तथा जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. अनुराधा राऊत यांनी अनोख्या पध्दतीत दिवाळी साजरी केली. दिवाळीच्या रात्री मध्यरात्रीच्या सुमारास हे दाम्पत्य घराबाहेर पडले. यादरम्यान त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या जवळपास ४० बेघर, निराधारांना थंडीपासून बचावासाठी शाल, आधार म्हणून खाद्यपदार्थ, बाम, औषधी, टूथपेस्ट, थंडीपासून बचाव करणारे मलम असे विविध साहित्य देऊन आपली सामाजिक बांधीलकी दाखवून दिली.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कुणालाही कळू न देता व विशेष म्हणजे शासकीय वाहनाचा वापर न करता खासगी वाहनाने जाऊन साहित्य हातात घेत पायी फिरत या दाम्पत्याने गरजूंना मदत केली. दिवाळीच्या रात्री अचानकपणे पोटाला आधार व थंडीपासून बचाव करणारे कपडे मिळाल्याने निराधार अक्षरश: भारावले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हाधिकारी म्हणून आजवर केलेली वाटचाल ही वाखाणण्याजोगी असतांनाच त्यांनी दिवाळीच्या मध्यरात्री कुणालाही सोबत न घेता, व चमकोगिरी टाळत गरजूंना केलेली मदत ही कौतुकाचा विषय बनली आहे.