


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।शहरातीलपिंप्राळा परिसरातील प्रख्यात‘कलादर्शन’ ड्रॉइंगक्लासेसतर्फे तसेच संचालक विजय चव्हाण सर यांच्या आयोजनातून भव्य ‘त्रिवेणी’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव येथील पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्या भव्य कलादालनात १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे प्रदर्शन कला रसिकांसाठी खुले राहणार आहे.
या प्रदर्शनात कलाकार मनीषा कुलकर्णी, भक्ती जाधव आणि जान्हवी जोशी यांनी साकारलेल्या विविध विषयांवरील आकर्षक आणि कलात्मक पेंटिंग्जचा समावेश करण्यात आला आहे. चित्रकलेच्या विविध शैली आणि विषयांचा अनोखा संगम या प्रदर्शनातून कला रसिकांना अनुभवता येणार आहे. त्यामुळे जळगावातील चित्रकला प्रेमींसाठी ‘त्रिवेणी’ प्रदर्शन एक विशेष पर्वणी ठरणार आहे.
प्रदर्शनात लँडस्केप, पोर्ट्रेट, कंपोज पेंटिंग, नाईफ पेंटिंग, मॉडर्न आर्ट, 3D पेंटिंग, अॅनिमल्स अँड बर्ड पेंटिंग, गॉड पेंटिंग, स्त्री सौंदर्य तसेच राजस्थानी कला शैलीतील पेंटिंग्ज अशा विविध प्रकारच्या कलाकृती पाहण्याची संधी मिळणार आहे. विविध माध्यमे, रंगछटा आणि कलाशैलींच्या माध्यमातून कलाकारांनी आपल्या कल्पनाशक्तीला दिलेले सुंदर रूप या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.
या कला प्रदर्शनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कलेसोबत सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा कलाकारांचा प्रयत्न. प्रदर्शनातील पेंटिंग्जच्या विक्रीतून मिळणाऱ्या निधीपैकी १० टक्के निधी अनाथ आश्रमासाठी आणि १० टक्के निधी वृद्धाश्रमासाठी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. कलावंतांनी आणि कलादर्शन ड्रॉइंग क्लासेसचे संचालक विजय चव्हाण सर यांच्या अनुमतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.
चित्रकलेच्या माध्यमातून सामाजिक योगदान देण्याचा हा उपक्रम कला क्षेत्रातील संवेदनशीलतेचे दर्शन घडविणारा ठरणार आहे. कलाकृतींच्या प्रदर्शनासोबतच त्यांच्या विक्रीतून समाजातील गरजू घटकांसाठी हातभार लावण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाला वेगळे महत्त्व प्राप्त करून देत आहे.
जळगावातील कला रसिक, चित्रकार, विद्यार्थी आणि कला क्षेत्रात रुची असलेल्या नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन कलादर्शन ड्रॉइंग क्लासेसचे संचालक विजय चव्हाण यांनी केले आहे. चित्रकारांच्या कलाकृतींना रसिकांकडून मिळणारे कौतुक, प्रोत्साहन आणि आशीर्वाद त्यांच्या भावी कलाप्रवासासाठी मोलाचे ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



