जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीच्या संधी, राज्यातील उत्पादने यांची निर्यातवृध्दी तसेच औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद शुक्रवारी, ११ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज, एमआयडीसी पोलीस स्टेशनजवळ, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे, राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी गुंतवणूक आकर्षित करणे, राज्यातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे. परिषदेत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मार्गदर्शन करणार आहेत.
या गुंतवणूक परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्रांमध्ये, विशेषतः कृषी क्षेत्रातील उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या उद्योगांसाठी गुंतवणूकीच्या संधींवर चर्चा केली जाईल. जिल्हा उद्योग केंद्र, जळगावचे महाव्यवस्थापक यांनी जिल्ह्यातील औद्योगिक संघटना, उद्योजक, औद्योगिक समूह, सनदी लेखापाल, आणि उद्योग व्यवसायांशी संबंधित शासकीय विभागांना या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.