जळगाव (प्रतिनिधी) पावसाळ्याच्या दिवसात अस्वच्छतेमुळे रोगराईचे प्रमाण वाढत असते. त्यातच चायनीज गाड्यांवरुन सर्रासपणे उघड्यावर खाद्य पदार्थ्यांची विक्री होते. ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील चायनीज गाड्यांवरील खाद्य पदार्थ्यांची तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिले आहेत.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस उप निरिक्षक दिलीप पाटील, अन्न व औषध प्रशासन विभागाचे व्ही. टी. जाधव, वैधमापन शास्त्र विभागाचे पी. पी. विभांडीक, कृषि विभागाचे संजय पवार, दूरसंचार विभागाचे एस. डी. उमराणी, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांचेसह अशासकीय सदस्य डॉ.अर्चना पाटील, सौ.पल्लवी चौधरी, ॲड.मंजुळा मुंदडा, विकास महाजन, साहित्यिक अ. फ. भालेराव, रमेश सोनवणे, बाळकृष्ण वाणी, शिवाजीराव अहिराव, सतीश गडे, सौ.उज्वला देशपांडे, विजय मोहरिर, मकसुद हुसेन नुरुदीन बोहरी, विजयकुमार पारख, कल्पना पाटील, सतीष देशमुख, विकास कोटेचा, नरेंद्र पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, उघड्यावर मांस विक्रीस बंदी असूनही अनेक ठिकाणी उघड्यावर मांस विक्री होत असल्याचे दिसून येते. यावर सर्व संबंधित विभागांने तातडीने कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी दिल्यात. त्याचबरोबर एस. टी. चे स्मार्ट कार्ड घेण्यासाठी नागरीकांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते. जिल्ह्याच्या ठिकाणी येऊनही स्मार्ट कार्ड मिळत नाही याचा नागरीकांना मोठा त्रास होतो. त्यामुळे ते तालुक्याच्या ठिकाणी मिळावे अशी सुचना अशासकीय सदस्यांनी केली असता एस. टी. चे स्मार्ट कार्ड जिल्ह्यातील कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मधून मिळावे. जेणेकरुन नागरीकांना त्रास होणार नाही यासाठी परिवहन विभागास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
सध्या शाळा, महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया तसेच शेतीचा हंगाम सुरु आहे. यासाठी नागरीकांना विविध दाखले तातडीने लागतात. यासाठी सेतू केंद्र चालकांकडून जास्त रक्कम आकारली जात असल्याची बाब बैठकीत निदर्शनास आणली असता सेतू केंद्रामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सर्व सेवांचे दर निश्चित केले आहे. यापेक्षा अधिक रक्कमेची कोणी मागणी करीत असेल तर तसे कळविल्यास त्याची तपासणी करुन सदरचे सेतू केंद्र बंद करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला. यावेळी अनेक अशासकीय सदस्यांनी ग्राहक हिताचे प्रश्न बैठकीत मांडले, यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेस दिल्यात.