
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, यंदाची परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि ‘कॉपीमुक्त’ वातावरणात पार पाडण्यासाठी कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. आता संवेदनशील परिक्षा केंद्रावर ड्रोनच्या माध्यमातून कडक नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज, ९ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे.

विद्यार्थी संख्या आणि केंद्र नियोजन:
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १४७ केंद्रांवर एकूण ५९ हजार ४२० विद्यार्थी बसणार आहेत. तर बारावीसाठी ८२ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, ४८ हजार २३२ विद्यार्थी परीक्षा देतील. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता, दोन संवेदनशील परीक्षा केंद्रे यंदा बाद करण्यात आली असून इतर सुरक्षित केंद्रांवर नियोजन करण्यात आले आहे. सर्व केंद्रांची विस्तार अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करण्यात आली असून, ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत, तिथे तात्काळ सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परीक्षेचे कडक नियम आणि ड्रोनचा वापर:
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्पष्ट केले की, परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरात सर्व झेरॉक्स दुकाने परीक्षेच्या काळात बंद राहतील. केंद्राच्या ५०० मीटर परिसरात कोणालाही विनाकारण फिरता येणार नाही. ज्या शाळांना संरक्षक भिंत नाही, तिथे तात्पुरते कुंपण (कम्पाऊंड) उभारले जाईल. केवळ अधिकृत ओळखपत्र असणाऱ्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. विशेष म्हणजे, संवेदनशील केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी यंदा ‘ड्रोन’ कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
भरारी पथके तैनात:
कॉपी रोखण्यासाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर विशेष फिरती पथके (भरारी पथके) तैनात करण्यात आली आहेत. “विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर किंवा गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा जिल्हाधिकारी घुगे यांनी यावेळी दिला. परीक्षेच्या या अचूक व्यवस्थापनामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.



