भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात महिलांच्या आरोग्य, आत्मविश्वास आणि समानतेचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ‘बीसारा लेडीज एक्वालिटी रन’ या धावस्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर स्पर्धकांसाठी तयार करण्यात आलेल्या अधिकृत टी-शर्ट आणि आकर्षक पदकाचा अनावरण सोहळा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यामुळे येत्या १२ एप्रिल रोजी होणाऱ्या मुख्य स्पर्धेबाबत शहरवासियांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून महिला धावपटूंचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
या विशेष कार्यक्रमाला प्रमुख प्रायोजक म्हणून माय फिटनेस जिमचे संचालक प्रमोद धनगर, रॉयल लॉन्सचे संचालक डॉ. मेहफूझ अली तसेच कुकरेजा सुपर शॉपीचे संचालक संजय कुकरेजा यांची उपस्थिती होती. मान्यवरांसह नूतन फालक आणि सहभागी धावपटू डॉ. सुवर्णा गाडेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे पदक व टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रमुख प्रवीण फालक, कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉ. निलिमा नेहेते व डॉ. चारुलता पाटील, तसेच संस्थेचे विश्वस्त ब्रिजेश लाहोटी, प्रवीण वारके आणि प्रवीण पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमात केवळ अनावरणच नव्हे, तर सातत्य राखणाऱ्या धावपटूंचा सन्मानही करण्यात आला. सुरुवातीपासूनच्या सर्व १५ प्रशिक्षण सत्रांमध्ये नियमित सहभाग नोंदवल्याबद्दल पुष्पा तिवारी, मनीषा सिंह, सारंग चौधरी आणि प्रवीण पाटील यांचे विशेष कौतुक करण्यात आले. यासोबतच धावण्याच्या सरावात सहभागी झालेल्या बालकांचाही गौरव करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी स्वाती फालक, कीर्ती मोटळकर, गरिमा न्याती, सायली बेंडाळे या महिला धावपटूंची उपस्थिती लक्षणीय होती.
आगामी १२ एप्रिल २०२६ रोजी भुसावळ येथील रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंडवर ही भव्य स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये ३ किमी, ५ किमी आणि १० किमी अशा तीन गटांचा समावेश असून, ५ किमी व १० किमी गटांसाठी ‘टायमिंग रन’ अशी विशेष तरतूद करण्यात आली आहे. महिलांना आरोग्याप्रती जागरूक करणे आणि समाजात समानतेचा विचार रुजवणे हा या स्पर्धेचा मुख्य गाभा आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती फालक, वर्षा वाडिले आणि सुयश न्याती यांनी विशेष सहकार्य केले.



