भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरांमधील एटीएम केंद्रांवर मदतीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या असून, भडगाव येथील एका वृद्धाला याचा मोठा फटका बसला आहे. एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या नावाखाली एका अनोळखी भामट्याने वृद्धाच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांच्या बँक खात्यातून १ लाख २० हजार ८१ रुपये लांबवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रतन वना पाटील (वय ८७, रा. वडगाव बु॥, ता. भडगाव) हे व्यवसायाने शेतकरी आहेत. ते ६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान शहरातील बडेसर कॉम्प्लेक्समधील एका एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी एका अनोळखी इसमाने त्यांना पैसे काढण्यास मदत करतो, असे भासवून त्यांचे विश्वास संपादन केला. संधी मिळताच त्या भामट्याने फिर्यादीचे एटीएम कार्ड शिताफीने बदलून दुसरेच कार्ड त्यांच्या हाती सोपवले.

वृद्धाला या प्रकाराची पुसटशीही कल्पना आली नाही. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून एकूण १ लाख २० हजार ८१ रुपये काढून घेण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी भडगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



