Home Cities जळगाव कचरावेचक महिलांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप

कचरावेचक महिलांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सुधर्मा ज्ञाननसभा संस्थेने यंदाची दिवाळी वंचित घटकांसाठी अधिक गोड केली आहे. समाजातील उपेक्षित, रस्त्यावरील कष्टकरी महिलांसाठी सुधर्माने दिवाळी साजरी करत मानवतेचा खरा दीप प्रज्वलित केला.

सुधर्मा ज्ञाननसभा ही संस्था गेली अनेक वर्षे गरीब, रंजले-गांजले आणि दारिद्र्याशी झुंज देणाऱ्या लोकांसाठी कार्यरत आहे. या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संस्थेने तांबापुरा, मेहरुण आणि मन्यारखेडा परिसरातील एकूण २६ कचरावेचक महिलांना दिवाळी भेट म्हणून आवश्यक किराणा साहित्य आणि फराळाचे वाटप केले. या महिलांना तेल, साखर, तूरडाळ, रवा, शेंगदाणे, बेसन अशा आवश्यक वस्तूंबरोबरच चिवडा, लाडू यांसारख्या फराळाच्या पदार्थांचा समावेश असलेले पॅकेट देण्यात आले.

हा उपक्रम “भाऊंचे उद्यान” येथे सकाळी १० ते ११ या वेळेत पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. नितीन गणपुरे यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या सोबत श्री. सुरेश सुर्यवंशी व श्री. संग्राम सुर्यवंशी हे मान्यवर देखील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी भगवद्गीतेची भेट देऊन केले. या प्रसंगी बेलसरे यांनी संस्थेचे कार्य गीतेच्या व ईश्वराच्या आशीर्वादानेच सुरु असल्याचे नमूद केले.

आपल्या भाषणात श्री. गणपुरे म्हणाले, “मी स्वतः एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो असून मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर हे पद मिळवले आहे. सुधर्मा संस्थेचे हे सामाजिक कार्य पाहून मला अत्यंत आनंद झाला. आज अशा अर्थपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मला अभिमान आहे.”

कार्यक्रमादरम्यान सुधर्माचे स्वयंसेवक विद्यार्थी — नितीन तायडे (समतानगर), भाग्यश्री नन्नवरे (खेडी) आणि सुवर्णा मराठे (मन्यारखेडा) — यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूर्यकांत हिवरकर आणि श्रेयस बेलसरे यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी संस्थेच्या वतीने ऋचा बेलसरे हिने सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

या उपक्रमामुळे शहरातील कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर दिवाळीपूर्वीच समाधानाचे हास्य उमटले. सुधर्माने केवळ वस्तूंचे नव्हे, तर माणुसकीचे वाटप केले — हीच या दिवाळीची खरी गोडी ठरली.


Protected Content

Play sound