Home Cities जळगाव जळगावला अवकाळी पावसाने झोडपले ; बाजारपेठेत तारांबळ, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

जळगावला अवकाळी पावसाने झोडपले ; बाजारपेठेत तारांबळ, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरासह परिसरात आज, सोमवारी (३० मार्च) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे मुख्य बाजारपेठेतील ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांची मोठी धांदल उडाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या तीव्र उकाड्यानंतर हवेत गारवा निर्माण झाल्याने जळगावकर सुखावले आहेत.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज दुपारपासूनच आकाशात ढगांची दाटी झाली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची पळापळ झाली. रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांना आपले सामान वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

पावसाचा जोर वाढताच खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले असले तरी, वाढत्या तापमानापासून दिलासा मिळाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी फांद्या तुटून पडल्याच्याही घटना घडल्या. उन्हाळ्याच्या तोंडावर झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आहे, मात्र बागायतदार शेतकऱ्यांच्या मनात पिकांच्या नुकसानीची धास्ती निर्माण झाली आहे.


Protected Content

Play sound