बोदवड प्रतिनिधी | “संपादित केलेल्या एकाही शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवरती भूखंड व्यापाऱ्यांनी फळबागेची झाडं, ठिंबक, पाण्याचा सोर्स केलेला नाही. अधिकाऱ्यांनी शेत जमिनीचे पंचनामे करून उताऱ्यावरील नोंदी त्वरीत निकाली काढण्यात याव्यात.” या मागणीसाठी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात “तालुक्यातील उपसा सिंचन योजने अंतर्गत येवती, जामठी, लोणवाडी या तीन गावांचा प्रामुख्याने समावेश आहे. येथील शेतकऱ्यांनी उताऱ्यावरील नोंदी कमी करण्याबाबत बोदवड तहसील कार्यालयामध्ये तक्रार केली असता तत्कालीन मा. तहसिलदार थोरात यांनी लोणवाडी येथील आठ ते दहा शेतकऱ्यांची प्रकरणे निकाली काढली होती. उर्वरित प्रकरणे दि.३१ जानेवारी २०१९ रोजी जिल्हा उपविभागीय कार्यालयांमध्ये पाठवण्यात आली होती. तीन वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना न्याय मिळेना.
‘आर टी एस डिव्हिजन/२०१९ क्र. ४२५ ते ५१०’ ही प्रकरणे प्रलंबित आहे. व्यापाऱ्यांना उपविभागीय कार्यालयातर्फे रजिस्टर पोस्ट तीन नोटीस बजावूनही एकही तारखेला प्रतिवादी हजर राहिले नाहीत.” असा उल्लेख केला असून ‘शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील बेकायदेशीर नोंदी कमी करण्यात याव्यात व शेतकऱ्यांना न्याय मिळावा’ या मागणीसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस प्रा. हितेश पाटील, युवक कार्याध्यक्ष भूपेंद्र जाधव, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, दीपक शिंदे, गणेश मानकर, अल्पेश महाजन आदी उपस्थित होते.