उटखेडा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा अभ्यास दौरामुळे ग्रामस्थामध्ये नाराजी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील उटखेडा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्य गेल्या दोन दिवसांपासून ग्रामपंचायतीला अक्षरशः कुलूप लावून अभ्यास दौऱ्यावर गेलेले आहेत. गावात समस्यांचा डोंगर उभा असताना या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करून, ग्रामपंचायतीच्या निधीचा अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली अपव्यय सुरू आहे. यामुळे पदाधिकाऱ्यांबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

उटखेडा येथील ग्रामपंचायतीच्या गचाळ कारभाराबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. गावात ठिकठिकाणी असलेले घाणीचे साम्राज्य, अस्वच्छ गटारी, मनमानी कारभार, यासह अन्य तक्रारी नागरिकांनी मांडल्या आहेत. या तक्रारी सोडविण्याकडे ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे.

अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेवक पाच दिवसांच्या अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. आदर्श गावांना भेटी देऊन आल्यावर या पदाधिकाऱ्यांच्या कामात कितपत सुधारणा होईल आणि गावाचा कितपत विकास होईल हे लवकरच नागरिकांना दिसून येणार आहे. गावात समस्या उभ्या असताना ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून पदाधिकारी अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली “एन्जॉय” करत आहेत. गावाला वाऱ्यावर सोडून ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या या अभ्यास दौऱ्याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विकास कामावर खर्च करण्यासाठी असलेला ग्रामपंचायतीचा निधी या दौऱ्याच्या नावाखाली खर्च करण्याचा “प्रताप” या पदाधिकाऱ्यांनी चालवला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात व दौऱ्यात निवडून आलेल्या महिला सदस्यांच्या पतीला भाग घेता येत नाही असा शासनाचा नियम आहे. मात्र उटखेडा ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या अभ्यास दौऱ्यात महिला सदस्यांचे पती व कुटुंबियांचा समावेश आहे. ग्रामसेवक शामकुमार पाटील यांनी शासनाच्या या आदेशाची पायमल्ली केली असून नियमांचा भंग केला आहे. याची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व रावेर पंचायत समितीच्या बीडीओ यांनी दखल घेवून ग्रामसेवकांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Protected Content