विधानसभा उपाध्यक्षपदांसाठी ‘या’ नेत्यांच्या नावाची चर्चा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तेसवा | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचे सरकार सध्या सत्तेवर आहे. असे असताना आता महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात आमदार अण्णा बनसोडे, लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे, तसेच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांची नावे चर्चेत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभा उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, आज दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ देण्यात आली आहे. अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असून, ते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

बनसोडे हे पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आहेत. 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदारकी मिळवली. त्यानंतर 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा ते पुन्हा निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पडल्यानंतरही ते अजित पवार यांच्या पाठीशी राहिले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला आणि पिंपरी मतदारसंघातील आपली ताकद सिद्ध केली.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेत्यांची निवड केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अधिवेशन अखेरच्या टप्प्यात आले असूनही अद्याप या निवडीला मुहूर्त मिळालेला नाही. सोमवारी विधानसभेत यावर जोरदार पडसाद उमटले. काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात ही निवड तातडीने करण्याची मागणी केली. संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. विधानसभा उपाध्यक्ष निवडणुकीचे निकाल आणि विरोधी पक्षनेते निवडीसंबंधी होणाऱ्या हालचालींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Protected Content