जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एका समाजाविषयी आक्षेपार्ह विधान करीत त्या समाजाची बदनामी करण्याच्या हेतूने त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी ७ ऑगस्ट रोजी सायकाळी ५ वाजता शहर पोलीस ठाण्यात ॲड. केदार भुसारी रा. बळीराम पेठ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील दूध फेडरेशन परिसरातील भारत नगरात पवन रमेश घुसर हे वास्तव्यास असून त्यांच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शनिवारी ५ ऑगस्ट रोजी जातीवाचक भाषेत तयार केलेला व्हीडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एका समाजाची बदनामी होत असल्याने त्यांनी त्या व्हिडीओबद्दल संपुर्ण माहिती काढली असता तो व्हीडीओ बळीराम पेठेतील ॲड. केदार भुसारी यांनी तयार केला होता. भुसारी यांनी या व्हिडीओत एका समाजाविषयी आक्षेपार्ह बोलून त्या व्हीडीओच्या माध्यमातून कारवाईची मागणी करीत तो व्हीडीओ महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांना पाठविला. त्यांनी तो व्हीडीओ मनपा कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर शेअर केला होता. या प्रकाराबाबत त्या समुदायातील नागरिकांना माहिती पडल्याने त्यांना समाजाचा अपमान झाल्याचे वाटून ते लागलीच शहर पोलिसात तक्रार देण्यासाठी आले होते. त्यांनी पोलिसांना समाजाची बदनामीकरणारा व्हीडीओ देवून पोलिसात पवन घुसर यांनी तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता ॲड. केदार भुसारी यांच्याविरुद्ध अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे करीत आहे.