हतनूर धरणातून विसर्ग सुरू; सततच्या पावसामुळे दहा दरवाजे एक मीटरने उघडले


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे जलसाठा झपाट्याने वाढत असून, खबरदारीचा उपाय म्हणून धरण प्रशासनाने आज 41 दरवाज्यांपैकी 10 दरवाजे एक मीटरने उघडले आहेत. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या हतनूर धरणाची पाणी पातळी 211.120 मीटरवर पोहोचली आहे. एकूण साठा 240.80 दलघमी असून, धरण सध्या 62.06 टक्के भरलेले आहे. संततधार पावसामुळे वाढलेल्या आवक पाण्याचा विसर्ग करण्यासाठी प्रशासनाने 570 क्युमेक्स (अंदाजे 20130 क्युसेक्स) वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरवाज्यांपैकी सध्या 10 दरवाजे प्रत्येकी 1.00 मीटरने उघडण्यात आले असून, भविष्यात पावसाचे प्रमाण अधिक राहिल्यास अतिरिक्त दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तापी नदी काठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, महसूल व जलसंपदा विभागाकडून परिसरात आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

धरण परिसरातील आवक कायम असल्याने नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळावा, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत पोहोचवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.