यावल-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव फुटता फुटता राहिला. गेल्या दहा ते बारा दिवसापूर्वी यावल शहरातील साठवण तलाव हा ओव्हरफ्लो होऊन त्या तलावाचे पाणी ओसंडून वाहत असल्याने बाजूच्या पाठचारीतून वाहू लागल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी गावातील लोकांशी संपर्क साधून त्या तलावा संदर्भात गावातील प्रतिष्ठित लोकांना कळवले. त्यामुळे साठवण तलाव परिसरातील शेतकऱ्यांचे होणारे पिकांचे नुकसान व मोठी दुर्घटना टळली, दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषदचे अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा क्षेत्राचे उपसंघटक नितिन सोनार यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल नगरपरिषदच्या माध्यमातुन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलाव हा ३० सप्टेंबर रोजी तुडूंब भरल्याने ओव्हरफ्लो होवुन वाहून जात असल्याचे त्या परिसरातील शेतकरी बांधवांच्या निर्दशनास आले. त्यावेळीच दक्षता घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला, दरम्यान या साठवण तलाव पाण्याच्या वाढलेल्या दबावामुळे फुटला असता तर या परिसरातील शेतकऱ्यांची गुरे ढोरे व पिकांचे फार मोठे नुकसान झाले असते शिवाय या घटनेमुळे यावल शहरातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असता, दरम्यान साठवण तलाव ओव्हरफ्लो प्रकारामुळे तलावास खराड्या पडल्याने या ठीकाणी कोणतीही अप्रीय घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या संपूर्ण प्रकरणात अशा प्रकारे बेजाबदारपणाने वागणाऱ्या संबधीत नगर परिषदच्या अधिकाऱ्यावर चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी नितीन सोनार यांनी केली आहे.