जळगाव प्रतिनिधी | जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज संपन्न झाले असून लाभार्थ्यांनी उपस्थिती देत प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी, ५ जानेवारी रोजी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज झाले. यात २३८ लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली. सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिव्यांगांच्या तपासणीच्या कामकाजाची पाहणी करत डॉक्टर व कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या.
उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ.मारुती पोटे यांच्यासह तज्ज्ञ डॉ.योगेंद्र नेहेते, डॉ.पूर्वा मणेरीकर, डॉ.विनोद पवार, डॉ.धर्मेंद्र पाटील, डॉ.स्नेहा पल्लोड, डॉ.संतोष पोटे यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी चेतन निकम, दत्तात्रय पवार, विशाल दळवी, आरती दुसाने, वाल्मिक घुले, प्रकाश पाटील, अजय जाधव यांनी सहकार्य केले.
“सकाळी दिव्यांग बांधवांची नेहमी होणारी गर्दी दिसली नाही. कुपन प्रणालीमुळे ज्यांना आजची दि.५ रोजीची तारीख मिळाली होती, त्यांनी कुपन दाखवून तपासणी केली. मागील वेळी ज्यांना एसटी बसमुळे येता आले नव्हते त्यांची देखील तपासणी करण्यात आली. कुपन प्रणाली यशस्वीरीत्या राबविली गेली, तसेच योग्य व्यवस्थापन केले म्हणून मंडळाच्या कार्यकारिणीसह कर्मचाऱ्यांचे कौतुक आहे.” असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.
दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्याबाबतची प्रक्रिया
‘www.swavlambancard.in’ या संकेत स्थळावर जात ‘Apply for Disability certificate & UDID card’ या लिंकवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणची देखील लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून दिव्यांग मंडळातून बुकिंग कुपन घ्यावे. कूपनवर दिलेल्या तारखेला अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट २ फोटो व जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे.