Home Cities जळगाव जळगावचा दिप्तेश सोनवणे राज्यस्तरावर अव्वल ; आदिवासी लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान

जळगावचा दिप्तेश सोनवणे राज्यस्तरावर अव्वल ; आदिवासी लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान

0
275

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  राज्यस्तरीय आदिवासी लघुपट स्पर्धेत जळगाव जिल्ह्याने अभिमानाने डोकं उंचावलं आहे. टोकरे कोळी समाजातील युवक दिप्तेश पांडुरंग सोनवणे यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्याचे आणि आदिवासी समाजाचे नाव राज्यभरात उज्ज्वल केले. “निसर्ग आणि आदिवासी” या त्यांच्या लघुपटाने परीक्षकांची मनं जिंकत राज्यातील सर्व स्पर्धकांमधून अव्वल स्थान मिळवले.

आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य आणि भगवान बिरसा कला संगम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही राज्यस्तरीय स्पर्धा १५ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे झाली. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिप्तेश यांना ३ लाख रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय आदिवासी मंत्री भारती पवार आणि आदिवासी मंत्री अशोक उईके उपस्थित होते.

दिप्तेश सोनवणे यांच्या “निसर्ग आणि आदिवासी” या लघुपटात आदिवासी समाजाचा निसर्गाशी असलेला घट्ट नातेसंबंध, सहजीवन, परंपरा आणि जगण्याची तत्त्वे भावनिक आणि कलात्मक पद्धतीने मांडली आहेत. या लघुपटाचे लेखन, छायाचित्रण आणि संकलन दिप्तेश यांनी स्वतः केले असून दिग्दर्शन प्रदीप भोई यांनी केले आहे. कलाकार म्हणून शितल नेवे यांनी प्रभावी भूमिकेत कामगिरी बजावली आहे.

राज्यभरातील अनेक स्पर्धकांमधून दिप्तेश यांनी मिळवलेले हे यश जळगाव जिल्ह्यासाठी आणि टोकरे कोळी समाजासाठी इतिहासात पहिल्यांदाच मिळालेला मोठा सन्मान मानला जात आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्हाभर आणि आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound