जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांगजन सक्षमीकरण विभागातर्फे आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिवसाच्या निमित्ताने ‘सर्वोच्च संस्था’ राष्ट्रीय पुरस्काराने दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग मंत्री डॉ.विरेंद्र कुमार, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग राज्यमंत्री ए.नारायण स्वामी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग राज्यमंत्री प्रतिमा भौमिक उपस्थित होते. संस्थेच्या वतीने दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यजुर्वेंद्र महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
भारतासारख्या लोकशाही देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता व उपलब्धतता महत्वाची मानली जाते. शासनाच्या व अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दिव्यांगासाठी विविध योजना व उपक्रम चालविले जातात. परंतु त्यांच्यासाठी मुख्य प्रवाहात येण्यासाठी विविध प्रकारच्या उच्च शिक्षणाच्या व्यवस्था उपलब्ध नव्हत्या. दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलच्या माध्यमातून देशातल्या दिव्यांगांना उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात येण्यासाठी व्यवस्था निर्माण केल्या. सर्व समावेशित शिक्षण हे जगात आदर्श शिक्षण मानले जाते, त्यानुसार मनोबल या प्रकल्पात सर्व प्रकारचे दिव्यांग एकत्र निवासी शिक्षण आणि प्रशिक्षण घेतात व त्यासोबतच अनाथ, आदिवासी, ग्रामीण, ट्रान्सजेंडर, शहरी असे सर्वच विद्यार्थी त्यांच्या सोबत शिक्षण घेतात. विशेषतः सर्व प्रकारच्या दिव्यांगाना अडथळाविरहित परिसर व तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलेले आहेत. अश्या प्रकारचा देशातील पहिला आदर्श प्रकल्प सुरु केल्याबद्दल दीपस्तंभ फाऊंडेशनला सर्व श्रेष्ठ संस्था राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कारांमध्ये दिव्यांग व्यक्तीला कलेसाठी देण्यात येणारा पुरस्कार दीपस्तंभ मनोबलचा माजी विद्यार्थी व सदस्य अकोला येथील वैभव सांगळेला देण्यात आला. जे.जे.स्कुल ऑफ आर्टस् मधून शिक्षण घेतलेला वैभव अतिशय उत्तम चित्रकार असून ऐकण्याची आणि बोलण्याची समस्या असूनही राष्ट्रीय स्तरावर त्याने उत्तम कामगिरी केली आहे. तसेच रेडिओ उडाण या मनोबलशी संबंधित असणारी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणारी प्रेरक वक्ता दिव्या शर्मा हिला वैयक्तिक श्रेणीतील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असे म्हणाल्या की, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देणे महत्वाचे आहे. दिव्यांगांचा प्रेरणादायी संघर्ष आणि कामगिरी सर्व नागरिकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. गेल्या काही वर्षांत दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे. योग्य सुविधा, संधी आणि सक्षमीकरणाच्या प्रयत्नांच्या मदतीने सर्व दिव्यांग व्यक्ती समानतेने आणि सन्मानाने जीवन जगू शकतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
दिव्यांग ,अनाथ विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या उच्च शिक्षणातील संधीसाठी देशभरामध्ये परिपूर्ण, सर्वसमावेशक व दीर्घकालीन व्यवस्था उभ्या करण्याचा संकल्प या पुरस्कारामुळे अधिक दृढ झाला आहे. विविध सामाजिक संस्था, शासन ,प्रशासन व उद्योग यांना एकत्र आणून हे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास वाटतो, अश्या भावना यावेळी दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केल्या आहे
दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त सुरवाडे यांनी विशेष शुभेच्छा या प्रसंगी दिल्या. या प्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. रवी महाजन, कोषाध्यक्ष सी.ए. तेजस कावडीया, राजेश झोलदेव, जया झोलदेव, मानसी महाजन, सुरज तिवारी, प्रतिष्ठा गोगिया, मोहिनी शर्मा, योगेश सूर्यवंशी उपस्थित होते.