
मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब ‘मातोश्री’वर पोहोचले आणि त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत तब्बल पावणे तीन तास चर्चा केली. जरी ही भेट स्नेहभोजनासाठी असल्याचे सांगितले जात असले, तरी दोन्ही नेत्यांमध्ये युतीसंदर्भात अंतिम चर्चेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या तीन महिन्यांतील ही राज-उद्धव यांची सहावी भेट ठरली आहे. यापूर्वी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून राजकीयदृष्ट्या दुरावलेले हे ठाकरे बंधू एकत्र आले होते. ५ जुलै रोजी ‘मराठी विजयी मेळाव्या’च्या माध्यमातून २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आलेल्या या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय समंजसतेच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळू लागले होते.
१२ ऑक्टोबर रोजी दुपारी राज ठाकरे पत्नी शर्मिला आणि कुटुंबासह ‘मातोश्री’वर दाखल झाले. तब्बल दोन तास ४० मिनिटे चाललेल्या या बैठकीत केवळ सामाजिक वा स्नेहभोजन एवढाच हेतू होता का, की खरोखरच युतीच्या अंतिम टप्प्यावर चर्चा झाली, यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. ही चर्चा मुंबई महापालिका निवडणुकीतील जागावाटप, प्रचारधोरणे आणि पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
राज ठाकरे यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कमध्ये आयोजित होणाऱ्या दीपोत्सवासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं गेलं आहे का, यावरही उत्सुकता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांची दीपोत्सवाला उपस्थिती युतीच्या औपचारिक घोषणेचा पहिला संकेत ठरू शकतो.
या आधी ५ जुलै, २४ जुलै, २७ ऑगस्ट, १० सप्टेंबर आणि ५ ऑक्टोबर रोजी राज-उद्धव यांच्यात झालेल्या भेटींमध्येही सौहार्दपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. मात्र, १२ ऑक्टोबरची ही भेट विशेष ठरते कारण ती कुटुंबासह स्नेहभोजनाच्या निमित्ताने झाली आणि त्याचवेळी इतकी दीर्घ चर्चा झाली.
राज ठाकरे ‘मातोश्री’वरून बाहेर पडताच त्यांच्या गाडीमागे मित ठाकरे, मिताली ठाकरे आणि उर्वशी ठाकरे यांच्याही गाड्या बाहेर पडताना दिसल्या. ही भेट सार्वजनिकतेपासून दूर ठेवण्यात आली होती, ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक पातळीवर युतीची पावले अधिक दृढ होत असल्याची शक्यता बळावली आहे.



