न्यूयॉर्क वृत्तसंस्था । बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव याने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत २०वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राहिलेल्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का दिला.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमित्रोवने तिसऱ्या मानांकित स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचे आव्हान ३-६, ६-४, ३-६, ६-४, ६-२ असे परतवून लावले. ही लढत तीन तास अन् बारा मिनिटे चालली. फेडररने पहिला सेट अवघ्या २९ मिनिटांत जिंकला होता. मात्र, पुढचा सेट दिमित्रोवने जिंकून बरोबरी साधली. यानंतर पुन्हा फेडररने बाजी मारून आघाडी घेतली. मात्र, पुढील दोन सेटमध्ये दिमित्रोवने फेडररला संधी दिली नाही. अंतिम सेटमध्ये दिमित्रोवने दोन वेळा फेडररची सर्व्हिस ब्रेक करून ४-० अशी आघाडी घेतली होती. यानंतर ३८ वर्षीय फेडररला पुनरागमन करण्यात अपयश आले. फेडररने ६१ टाळत्या येण्यासारख्या चुका केल्या. त्याचा त्याला फटका बसला. लढतीदरम्यान मानेचा त्रास होत असल्याने फेडररने वैद्यकीय मदतही घेतली.माझ्या परीने मी सर्वोत्तम प्रयत्न केले. मी अखेरपर्यंत लढलो, असो… अशी प्रतिक्रिया फेडररने पराभवानंतर व्यक्त केली. फेडररने २००८मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर मात्र या स्पर्धेची ट्रॉफी त्याला काही उंचावता आलेली नाही.
सध्या मी खूप आनंदात आहे. मी शेवटपर्यंत स्वत:ला बजावत होतो, की आपल्याला शेवटपर्यंत लढतीत कायम राहायचे आहे. या लढतीत शरीराचीही चांगली साथ मिळाली. कारण, माझे काही फटके एवढे जबरदस्त होते, की लावणे सोपे नव्हते. – ग्रिगोर दिमित्रोव, बल्गेरिया टेनिसपटू