खामगाव प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून याची पाहणी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केली.
याबाबत वृत्त असे की, गेल्या अनेक दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने काल रात्री बुलडाणा जिल्हयात सर्वत्र जोरदार हजेरी लावली. शेगांव,संग्रामपुर,जळगांव जामोद तालुक्यात धो-धो पाउस पडल्याने सर्व नदी नाल्यांना पुर आला होता. मन नदीला पुर आल्यामुळे तालुक्यातील जवळा बु. या गावाचे उस्मान शाह हे पुरात वाहुन गेले. सकाळी गावापासुन एक किलो मिटर अंतरावर त्यांचे प्रेत आढळुन आले. खामगांव मतदार संघातील शेगांव तालुक्यातील एकफळ,तिव्हाण,सांगवा,जानोरी, अळसणा या गावामध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे मन नदीच्या काठावर असलेल्या गावातील अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले तर काही ठिकाणी घरांची पडझड होउन साहित्यांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्यांच्या शेतात पाणी घुसल्याने त्यांच्या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तिव्हाण या गावाला भेट देउन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत शेगांव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव तुषार चंदेल, सरपंच अजय गवई, सुर्यकांत शेगोकार, श्रीकृष्ण गवई यांच्यासह तिव्हाण येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट असतांना झालेल्या नैसर्गिक आपत्तीने नागरीकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरीकांनी झालेल्या नुकसानीचे फोटो काढुन नुकसान भरपाई मिळण्याकरीता तहसीलदार यांच्याकडे रितसर अर्ज करावा. झालेल्या नुकसानीबाबत मा.जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन संबंधीतांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना देउन शासनाकडुन निकषाप्रमाणे मदत मिळवुन देण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करु अशी ग्वाही देत माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी नुकसानग्रस्तांना धीर दिला.