मतांसाठी दिग्विजयसिंहांनी १६ वर्षांनंतर मागितली सरकारी कर्मच्याऱ्यांची माफी

 

 

pjimage 4 2

 

 

भोपाळ (प्रतिनिधी) आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरणारे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी १६ वर्षापूर्वी केलेल्या चुकीची माफी मागितली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भोपाळ येथून काँग्रेसचे दिग्विजय सिंह निवडणूक लढवत असून बुधवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी दिग्विजय सिंह यांना २००३ मध्ये मुख्यमंत्री असताना केलेली चूक अचानक लक्षात आली. सरकारी कर्मचारी संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या होळीच्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या या चुकीबद्दल माफी मागितली आहे.

यावेळी दिग्विजय सिंह म्हणाले की, आज होळीचा उत्साह आहे. १५ वर्ष झाली, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा. मी खासदार म्हणून जिंकून आल्यानंतर तुम्हाला दिलेलं प्रत्येक आश्वासन पूर्ण करेन, तुम्हाला माहिती आहे, मी कधीही खोटं बोलत नाही. मी मुख्यमंत्री असताना कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

२००३ विधानसभा निवडणुकीदरम्यान वेतन आणि भत्ते यांच्या मागणीवरुन मध्य प्रदेशातील सरकारी कर्मचारी नाराज होते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला नऊ टक्के डीए देण्यात यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राज्य सरकारच्या २८ हजार पेक्षा अधिक कंत्राटी कामगारांना नोकरीवरुन काढण्याचे आदेश दिले होते. दिग्विजय सिंह यांच्या निर्णयावर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता. त्यावेळी दिग्विजय सिंह यांनी निवडणुका जिंकण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मतांची गरज नाही, असे उर्मट विधानही केले होते, त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला होता.
आता अनेक वर्षानंतर दिग्विजय सिंह यांना काँग्रेसने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात दोन लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि निवृत्त सरकारी कर्मचारी राहतात. त्यामुळे या दोन लाखांहून अधिक मतांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्नशील आहे.

Add Comment

Protected Content