फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । नगरपरिषद निवडणुकीच्या कार्यक्रमाची रूपरेषा निवडणूक विभागाकडून ठरविण्यात येत आहे. मात्र, फैजपूरचे माजी नगरसेवक शेख कुर्बान यांनी प्रभाग रचनेविरोधात तक्रार दाखल केली असून या तक्रार अर्जानुसार प्राप्त झालेल्या प्रभाग याद्यांनुसार काही प्रभागांच्या मतदार संख्येमध्ये दिडीचा तर काहीत दुपटीचा फरक आढळल्याचे दिसत आहे.
येथील नगरपरिषद निवडणूक कार्यक्रमाची रूपरेषा निवडणूक विभागामार्फत निश्चित केली जात आहे. सदर प्रकरणात फैजपूरयेथे मतदारांच्या संख्येनुसार निवडणूक विभागाकडून प्रभाग रचना करण्यात आली आहे. मतदार संख्येनुसार प्रभाग संरचना करताना, १०० ते २०० मतदारांची संख्या प्रभागानुसार कमी-जास्त असू शकते. परंतु उपलब्ध प्रभाग क्र २ ते ७ च्या उपलब्ध आकडेवारीनुसार प्रभाग संरचना ही सर्व नियमांना फाटा देऊन विशिष्ट लोकांना फायदा होण्याकरिता प्रभाग संरचना केल्याची दिसून येते. कारण सदर आकड्यांचे अवलोकन केले असता प्रभाग क्र ७ मध्ये एकूण मतदार १४५४ आहेत. तर प्रभाग क्र २ मध्ये एकूण मतदार ३५३७ आहेत. सदर बाब लोकशाहीतील मतदारांच्या अधिकाराला बाधक ठरणारी आहे.
जाती, धर्म या बाबी नाकारत कोणत्याही प्रभागाची मतदार संख्येमध्ये इतर प्रभागाच्या मतदार संख्येमध्ये १०० ते २०० मतदारांपेक्षा संख्या कमी-जास्त न ठेवता नवीन मतदार संख्येनुसार संरचना करून लोकशाही बळकट करण्याकरिता फैजपूर येथील मतदारांना न्याय देण्यात यावा. अन्यथा पुढील कार्यवाहीसाठी न्यायालयात पिटीशन दाखल व निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येईल अशी मागणी माजी नगरसेवक शेख कुर्बान यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.