Home आरोग्य रमजीपुरात अतिसाराची लागण; दोघांचा मृत्यू; १३ जण उपचार केंद्रात दाखल

रमजीपुरात अतिसाराची लागण; दोघांचा मृत्यू; १३ जण उपचार केंद्रात दाखल

0
43

traetment

रावेर शालीक महाजन । तालुक्यातील रमजीपूर येथे अतिसाराची लागण झाली असून यात आठवडाभरात दोघांचा मृत्यू झाला असून १३ जण उपचार केंद्रात उपचार घेत आहेत.

याबाबत वृत्तांत असा की, येथे आठवडा भरापासून दुषित पाण्यामुळे डायरिया होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर गावातील एकूण ८६ जणांना डायरियाची लागण झालेली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे, त्यापैकी तेरा रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर गावातील अंगणवाडीच्या इमारतीत तात्पुरता उभारलेल्या उपचार केंद्रात औषधोपचार सुरु आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे.अज्ञात व्यक्ती कडून गावाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फोडल्याने गावात दुषित पाणीपुरवठा झाल्याने साथ लागल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात ग्रामपंचायतीच्या कारभारा विषयी नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

दोघांचा मृत्यू

गावात दुषित पाणी पिल्यामुळे संडास व उलटी होण्याचे प्रमाण आठवडाभरा पासून सुरु होते. मात्र दररोज दोन-चार रुग्ण असल्याने याची फारशी चर्चा झाली नाही. दोघे मयतांच्या नातलगांच्या म्हणण्या नुसार संडास व उलटी होण्याच्या त्रासामुळे गुरुवारी दि.५ रोजी मनीषा राजू वानखेडे (वय २६) ही महिला तर रविवारी (दि. ८) रोजी याच त्रासामुळे काशिनाथ सोना तायडे (वय ५५) या दोघांच्या मृत्यू झाल्याचे दोघांच्या नातलगांनी सांगितले तेव्हा नागरिकांना गावात डायरियाची शंका आली.

बाधित उपचार केंद्रात

डायरियाचा अधिक त्रास होत असलेल्यांमध्ये पराग महाजन,दीपक महाजन,हजराबाई तडवी,वंदना महाजन, साक्षी कवडकर,कांचन महाजन, रुपाली महाजन,गोविंदा कवडकर,समशेर तडवी,मंगलाबाई महाजन,अय्युब तडवी,अकिल तडवी या तेरा जणांना या उपचार केंद्रात दाखल करून घेण्यात आले असून त्यांच्यावर ऐनपूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही डी. महाजन,डॉ. संजय चौरे, यांच्यसह आठ जनाचे पथक उपचार करीत आहेत. तर तीन महिन्याच्या बाळावर रावेर ग्रामीण रुग्णालयात तर अनेक रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन दिवसांपासून ऐनपूर येथील प्राथमिक आरोग्य विभागा तर्फे प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले असून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपचार म्हणून औषधी वितरण करण्यात आली आहे.

तहसिलदारांची भेट व पाहणी

डायरियाची साथ लागल्याची माहिती मिळताच रमजीपूरला जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे साथरोग विस्तार अधिकारी अजय चौधरी यांच्यासह तहसीलदार उषाराणी देवगुणे, पंचायत समितीच्या सभापती माधुरी नेमाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गोपाल नेमाडे, सहाय्यक गट विकास अधिकारी हबीब तडवी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील यांनी अंगणवाडीतील उपचार सुरु असलेल्या रुग्णांना भेट देऊन पाहणी केली.

लवकरच स्थिती नियंत्रणात- डॉ. महाजन

गावात दूषित पाणी पुरवठा मुळे डायरीयाची लागण झाली असून त्यांच्या उपचार सुरु असून गावात आरोग्य कॅम्प लावण्यात आला असून पुढील दोन दिवसात स्थिती चांगली होईल अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक महाजन यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना दिली.


Protected Content

Play sound